Param Bir Singh's Letter: परमबीर सिंह यांच्या निर्णयामुळेच सचिन वाझे पुन्हा सेवेत- शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजिनाम्याची मागणी जोर धरु लागली असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच आपली भूमिका मांडली.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर असले तरी त्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. तसंच सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पुन्हा पोलिस सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांचाच असून त्यात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कालपासून परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन राज्यात एकच गदारोळ उठला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजिनाम्याची मागणी जोर धरु लागली असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच आपली भूमिका मांडत होते. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  (Param Bir Singh's Letter: महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र- सचिन सावंत)

पुढे ते म्हणाले की, "100 कोटी कोणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे बदली झाल्यानंतर परमबीर यांनी आरोप केले. आयुक्त असताना त्यांनी कोणतेही आरोप केले नाहीत." मनसुख  यांची गाडी वाझे यांनीच घेतली आणि त्यात स्फोटकं ठेवली, असंही ते म्हणाले.

तसंच देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आल्याचंही ते म्हणाले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या मंत्रीपदाबाबतही मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत सर्वांशी बोलून याबाबत उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असला तरी त्यात यश येणार नाही हे ही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.