President of India: Sharad Pawar असणार पुढचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? Prashant Kishor जोरदार लॉबिंग करत करत असल्याची चर्चा

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामध्ये आता देशातील राजकीय घडामोडी झपाट्याने बदलत आहेत. पुढच्या वर्षी बर्‍याच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबरोबरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Presidential Election 2022) आणि त्यानंतरच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबतही हालचाली सुरु झाल्या आहेत

President of India: Sharad Pawar असणार पुढचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? Prashant Kishor जोरदार लॉबिंग करत करत असल्याची चर्चा
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामध्ये आता देशातील राजकीय घडामोडी झपाट्याने बदलत आहेत. पुढच्या वर्षी बर्‍याच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबरोबरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Presidential Election 2022) आणि त्यानंतरच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबतही हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra) यांची भेट घेतली व त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पुढील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे की प्रशांत किशोर शरद पवार यांना भारताचे पुढचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यासाठी लॉबिंग करत आहेत. इंडिया टूडेने याबाबत वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची सुमारे तीन वेळा भेट घेतली आहे. असे मानले जात आहे की, प्रशांत किशोर हे सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘तिसरी किंवा चौथी आघाडी’ भाजपला आव्हान देऊ शकेल असा त्यांचा विश्वास नाही. तसेच कालच्या बैठकीमध्ये  शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी (यूपीएमधून) उभे करण्याबाबतही कोणतीही चर्चा झाली नाही, असे  कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले आहे.

परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीमध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध विरोधकांच्या राजकीय लढाईसाठी मोर्चेबांधणीबाबत चर्चा झाली असावी. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी.

(हेही वाचा: 'अरे भाई गुस्से की बात नही', मला निमंत्रणच नव्हतं; शरद पवार, एके पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या भेटीवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया)

सूत्रांचे म्हणणे आहे की प्रशांत किशोर यांच्या अंदाजानुसार ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल (BJD) नेते नवीन पटनाईक यांनी नॉन-एनडीए पक्षांशी हातमिळवणी केल्यास, राष्ट्रपतीपदाची निवडणुक विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी अनुकूल ठरेल. सूत्रांनी सांगितले की, नुकतेच प्रशांत किशोर यांनी नवीन पटनायक आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची भेट घेतली.

प्रशांत किशोर यांच्या हिशोबानुसार, विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण झाल्यास, ही गोष्ट भाजपला उलथवून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गेम चेंजर ठरू शकते. दरम्यान, प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी, जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टालिन, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत या पक्षांना एकत्र आणणे अवघड नाही, मात्र त्यांच्यासोबत कॉंग्रेसला एकत्र आणण्याची आवश्यक आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2021 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).