Video: शरद पवार यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची नक्कल; उपस्थितांमध्ये पिकला हशा
अवकाळी पावसामुळे झालेले शेतीच्या नुकसानीची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपूर (Nagpur) येथील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोला लगावला. शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केवळ टोलाच लगावला नाही तर, त्यांच्याच शब्दात त्यांची नक्कलही केली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस या आघाडीचे सरकार स्थिर राहणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटल्याचा दाखला देत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आपल्याला याबाबत खरेच काही माहिती नाही. माझ्या डोक्यात अद्याप त्यांचे ते 'मी परत येईन... मी परत येईन..' हेच आहे, असे पवार यांनी सांगितले. पवार यांचे हावभाव आणि टायमिंग पाहून उपस्थितांमध्ये मात्र एकच हशा पिकला.
शरद पवार हे गेले दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले शेतीच्या नुकसानीची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांची भावना जाणून घेतल्यावर आपण ही भावना केंद्र सरकारच्या कानावर घालू. त्यासाठी अर्थमंत्रालय आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाशी चर्चा करु. त्यातूनही काही प्रतिसाद मिळाला नाही तर, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करु असेही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, नागपूर: ..तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटेन; शरद पवार यांनी दिला निर्णयप्रक्रियेचा दाखला)
व्हिडिओ
दरम्यान, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. या वर पत्रकारांनी विचारले असता मी “मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही,” असे पवार म्हणाले. या वेळी बोलताना पवार म्हणाले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. हे सरकार स्थिर राहील असा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठीच किमान समान कार्यक्रम तयार करत आहोत, असेही पवार म्हणाले.