Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील गावदेवी पोलिसांमध्ये तक्रार
शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे ही धमकी आली आहे. शरद पवार यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेतील पोलीस ऑपरेटरने याबाबत पोलिसांमध्ये (Mumbai Police) तक्रार दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Gets Death Threat) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे ही धमकी आली आहे. शरद पवार यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेतील पोलीस ऑपरेटरने याबाबत पोलिसांमध्ये (Mumbai Police) तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांचा कालच वाढदिवस साजरा झाला. वाढदिवस साजरा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अशी धमकी आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. मुख्य आरोपीपर्यंत शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
शरद पवार यांना अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकीमध्ये म्हटले आहे की, 'गावटी कट्ट्याने आपली हत्या करण्यात येईल. ही हत्या सिल्वर ओक येथेच करण्यात येईल', असेही या अज्ञात व्यक्तीने धमकीमध्ये म्हटले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. आलेली धमकी गांभार्याने घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, यापूर्वीही पवार यांना अशा प्रकारची धमकी आली होती. (हेही वाचा, Gujarat Election Results 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकालांवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले ?)
दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या, प्रसिद्ध आणि अतिमहत्त्वाच्या लोकांची हत्या करण्याच्या धमक्या यापूर्वीही अनेकदा आल्या आहेत. पाठिमागील काही दिवसांमध्ये तर फोनवरुन आलेल्या धमक्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी अनेक प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास केला असता या धमक्यांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. विशेष म्हणजे या धमक्या अत्यंत पोरकटपणाच्या असून यापाठिमागे कोणीतरी मनोविकार असलेली व्यक्ती असल्याचे आढळून आले आहे.
काही प्रकरणांमध्ये आरोपींनी नशापाणी करुन अशाप्रकारचे कृत्य केल्याचे पुढे आले आहे. असे असले तरी कोणत्याही प्रकारची धमकी पोलीस गांभीर्यानेच घेत असतात. प्रत्येक धमकीच्या पाठिमागे मूळ आरोपी कोण आहे. त्याने धमकी देण्यामागचे नेमके कारण काय आहे या सर्व गोष्टींचा पोलिसांनी वेळोवेळी तपास केला आहे. वेळ प्रसंगी आरोपींना कठोर शिक्षाही झाली आहे. काही प्रकरणांमध्ये मात्र खास करुन जे आरोपी मनोरुग्णअसतात अशांना सुधारगृहात पाठवून सोडून दिले जाते. इतर वेळी मात्र पोलीस कायद्याची अंमलबजावणी कडकपणे करताना दिसून आले आहेत.