राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज भरणार अर्ज; भाजपकडून रामदास आठवले यांचे नाव निश्चित

26 मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणार्‍या आगामी निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2020), राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षाच्या नेत्या फौजिया खान (Fouzia Khan) यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत

शरद पवार व फौजिया खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

26 मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणार्‍या आगामी निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2020), राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षाच्या नेत्या फौजिया खान (Fauzia Khan) यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शरद पवार व फौजिया खान आज मुंबईतील विधानभवनात आपले अर्ज भरणार आहेत. शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य माजिद मेमन यांची मुदतही संपुष्टात आल्याने, रिक्त झालेल्या दुसर्‍या जागेसाठी फौजिया खान या माजी मंत्र्यांना संधी देण्यात येत आहे. 13 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.

महाराष्ट्रातील रिक्त असलेल्या सात जागांपैकी चार जागा महा विकास आघाडीच्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीकडे दोन जागा आणि शिवसेना-कॉंग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन्ही जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत, तर शिवसेना व कॉंग्रेसचे उमेदवार कोण असतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महत्वाचे म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक प्रथमच लढवणार आहेत.

भाजपच्या रिक्त जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचे नाव निश्चित केले जात आहे, तर दुसर्‍या जागेसाठी भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य संजय काकडे प्रयत्नशील आहेत, कारण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच ही जागा रिक्त होत आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले महाराष्ट्र विधानसभेत आले, त्यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी आपले नाव निश्चित झाल्याची पुष्टी दिली. (हेही वाचा: मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही; जितेंद्र आव्हाड यांचे गणेश नाईक यांना प्रत्युत्तर)

दुसरीकडे भाजपवर, राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांना पाठविण्याचा दबाव आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. या जागेसाठी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही चर्चेत आहे. फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.