महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इथे होणार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची फाईट, राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची

राज ठाकरे यांची घणाघाती भाषणं, शरद पवार नावाच्या सत्तरीपार नेत्याचा तिशीतला उत्साह आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून केंद्रीय नेतृत्वाच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री) यांच्या मदतीने केलेला झंजावती प्रचार महाराष्ट्राच्या स्मरणात राहील.

Sharad Pawar, Devendra Fadnavis, Raj Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Assembly Election Results 2019) मतमोजणी झाली. अनेकांसाठी अपेक्षीत, अनपेक्षीत निकाल आला. या निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे (Raj Thackeray ) हे चौघे खऱ्या अर्थाने हिरो ठरले. राज ठाकरे यांची घणाघाती भाषणं, शरद पवार नावाच्या सत्तरीपार नेत्याचा तिशीतला उत्साह आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून केंद्रीय नेतृत्वाच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री) यांच्या मदतीने केलेला झंजावती प्रचार महाराष्ट्राच्या स्मरणात राहील. असाच सामना महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरणार आहे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan-Dombivali Municipal Election 2020) आणि कोल्हापूर महानगरपालिका,निवडणूक. अर्थात या निवडणूकीस अद्याप बराच काळ असला तरी, या सामन्याची चर्चा मात्र जोर धरु लागली आहे.

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका तसेच, नवनिर्मित तीन नगर परिषदा व 64 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी 2 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या निवडणुका त्या वेळी विशेष कारणांमुळे चर्चेत आल्या. या निवडणुकांना विधानसभा निवडणूक 2014 आणि त्यानंतर सत्तेसाठी प्रदीर्घ काळ शिवसेना-भाजप यांच्यात सुरु राहिलेल्या संघर्षाची किनार होती. याही निवडणुकीत शिवसेना-भाजप हे प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीप्रमाणे वेगवेगळे लढले होते. त्यामुळे नव्यानेच सत्तेत आणि पदावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राज ठाकरे यांनीही या निवडणूकीत जोरदार प्रचार केला होता. परंतू, त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. पण, राज ठाकरे यांची भाषणे प्रचंड लोकप्रिय ठरली.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतल भाषणे तेव्हा प्रचंड गाजली. वाघाच्या जबड्यात घालून होत मोजतो दात वैगेरेची भाषा तेव्हा भाजपकडून करण्यात आली.दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढत, स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मनोदय केला होता. परंतू, जनमताने दोन्ही पक्षांना धक्का दिला. जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही. या निवडणुकीत शिवसेना 52, भाजप 42, मनसे 9, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2 अशा फरकाने जनतेने कौल दिला. हा कौल स्पष्टपणे सांगत होता की, सत्ता स्थापन करायची तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना सोबत यावे लागेल. परिणामी सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल - सचिन सावंत)

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक 2020 मध्येही असाच सामना रंगू शकतो. असा सामना रंगला तर या वेळीही देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळू शकेल. पण, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत विरोधी पक्षांचा आधार ठरत ताकद वाढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकीत उतरणार का याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शरद पवार यांनी ज्या तडफेने प्रचार केला तो पाहता देवेंद्र फडणवी, उद्धव ठाकरे यांच्या युतीचा विजयही झाकोळून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळणार का, अशी उत्सुकता आहे.