पुण्यात चार मुलांचा विनयभंग; 'गुड टच, बॅड टच' शिकवताना अश्लील स्पर्श, शिक्षकाला अटक
या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते.
एका शिक्षकाकडूनच विद्यार्थ्यांचा विनयभंग घडल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांना लैंगिकतेची जाणीव व्हावी. त्यांना स्पर्शास्पर्शांमधील फरक ध्यानात यावा. यासाठी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील भेद शिकवत असताना एका क्रीडा शिक्षकाकडून हे कृत्य घडले. हडपसर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार उघडकीस आला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी संबंधित क्रीडा शिक्षकाला (वय ४० वर्षे) अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार उघडकीस आलेल्या शाळेत आरोपी गेली सात वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेली पाच महिने हा शिक्षक विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे देत होता. दरम्यान, हे धडे देत असताना इयत्ता नववीत शिकणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचा त्याने लैंगिक छळ केला असा आरोप आहे. लैंगिकतेचे धडे देत असताना आरोपी शिक्षक महोदय हे विद्यार्थ्यांना अश्लिल पद्धतीने तसेच, त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श करायचे. गेली पाच महिने हा प्रकार सातत्याने सुरु आहे. तसेच, या शिक्षकाने विविध कार्यक्रमात हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. (हेही वाचा, भयानक! तरुणाच्या गुप्तांगामध्ये प्रेशर पंपने भरली हवा)
हडपसर पोलिसांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधीत क्रीडा शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करुन आम्ही अधिकाधिक पुरावे जमा करु. गेल्या काही दिवसांत अशा बऱ्याच घडना उघडकीस आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यातही फातिमानगर येथील एका नामांकित शाळ्याच्या मुख्याध्यापकास १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती, असी माहिती हडपसर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.