Rajnitai Satav Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनीताई सातव यांचे निधन

गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनीताई सातव (Rajnitai Satav) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. उपचारादरम्यान नांदेड येथील डॉ. काबदे हॉस्पिटल येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या त्या मातोश्री होत्या. माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एक वेळेस विधानसभा आणि एकदा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले. (हेही वाचा - Rajiv Satav Passes Away: काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन; Randeep Singh Surjewala यांनी ट्विटद्वारे शेअर केली दु:खद बातमी)

पाहा पोस्ट -

सातव घराणे मागील 43 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते. काँग्रेस पक्षात रजनीताई ज्येष्ठ नेत्या म्हणून काम करत असताना त्यांनी आपले चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात सक्रिय केलेले होते. त्याचबरोबर आता त्यांची सून आमदार प्रज्ञाताई सातव यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत.  रजनी सातव यांच्यावर सोमवारी दुपारी १२ वाजता कळमनुरीमधल्या विकास नगर येथे अंत्यसंस्कार होतील.

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे 2021 च्या मे महिन्यात निधन झाले होते. ते 46 वर्षांचे होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्युमोनियाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती.