Jaiprakash Chhajed Dies: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला: नाना पटोले

जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले

Jaiprakash Chhajed ( Photo Credit: Twitter/@NANA_PATOLE)

मुंबई, दि. ११ जानेवारी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.  (Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?)

नाशिक शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक व कामगार क्षेत्रात जयप्रकाश छाजेड सक्रीय असायचे. पक्ष संघटनेसोबतच कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत व कामगारांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नाशिक शहर व राज्य पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांच्या हितासाठी लढणारा एक आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.