Kalyan Girl Rape-Murder Case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम न्यायालयात बाजू मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जर कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल', असे फडणवीस म्हणाले.

Photo Credit- X

Kalyan Girl Rape-Murder Case: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी शनिवारी कल्याणमधील 13 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी कठोर आणि जलद कारवाईचे आदेष दिले आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे बलात्कार-हत्या प्रकरणाची न्यायालयात बाजू मांडणार आहेत. शिवाय, 30 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. "पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी होती. तिला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. लवकरच दोषींना कठोर शिक्षा होईल."

शनिवारी पीडितेच्या पालकांनी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडून न्याय देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल यावर भर दिला. (Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार)

पीडितेच्या कुटुंबाला पूर्णपणे सुरक्षित वाटेल याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्या. "कुटुंबाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. जर कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गुन्हेगार तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

'हे प्रकरण केवळ एका कुटुंबाशी संबंधित नसून सर्व मुलींच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मुद्दा आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी वकिलाची नियुक्ती करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आणि 30 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे त्यांचे निर्देश. न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,' असे बैठकीनंतर अमरजीत मिश्रा म्हणाले. याशिवाय, अमरजीत मिश्रा यांनी पीडितेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

याआधी गुरुवारी कल्याण शहरातील विशेष पोक्सो न्यायालयाने विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना 2 जानेवारीपर्यंत एका आठवड्याची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल गवळीवर मुलीचे तिच्या घराजवळून अपहरण करून, तिला बळजबरीने ऑटोरिक्षात बसवून त्याच्या घरी नेण्याचा, तिच्यावर हल्ला, बलात्कार, खून आणि त्यानंतर जवळपास 8 किमी अंतरावर असलेल्या भिवंडी शहरातील स्मशानभूमीजवळ तिचा मृतदेह फेकल्याचा आरोप आहे. (Wadala Sex Racket Case: मुलुंडमध्ये 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ब्लॅकमेल आणि आधारचा गैरवापर करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल)

काही सामान विकत घेण्यासाठी पिडित मुलगी घरातून बाहेर पडली ती परत आलीच नाही. 25 डिसेंबर (बुधवार) रोजी तिचा मृतदेह सापडला. काही तास उलटूनही मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून सोमवारी रात्री मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर संशयाची सुई गवळी दाम्पत्याकडे वळली होती. बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर, कथित गुन्हेगारांची पळून जात असताना झालेल्या चकमकीत एन्काऊंटर झाले होते.