Schools Reopen in Mumbai & Thane: मुंबई, ठाणे येथील शाळा 18 जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता
मात्र कोविड-19 संसर्गाच्या धोक्यामुळे मुंबई, ठाण्यातील शाळा 15 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) वगळता राज्यातील इतर भागातील शाळा 4 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कोविड-19 (Covid-19) संसर्गाच्या धोक्यामुळे मुंबई, ठाण्यातील शाळा 15 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु, आता 18 जानेवारी, सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता मुंबई, ठाण्यातील शाळांमध्ये 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु होण्याची सकारात्मक चिन्हं दिसू लागली आहेत. मात्र नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांना कोरोना निगेटीव्हीट रिपोर्ट देणे आवश्यक आहे.
दरम्यान, शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने तयारीही सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांची स्वच्छता, र्निजतुकीकरणाची कामे पालिकेच्या शिक्षण विभागाने हाती घेतली आहेत. यात अलगीकरण कक्षासाठी वापरल्या गेलेल्या शाळांच्या र्निजतुकीकरणावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर पालिका शाळांना साबण, थर्मामिटर, ऑक्सिजन मीटर देखील पुरवण्यात येणार आहेत. (Schools Reopen in Nashik, Pune, Aurangabad From Today: नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु)
त्याचबरोबर खाजगी शाळांचे र्निजतुकीकरण करण्यासाठी पालिकेने मदत करावी, अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र अलगीकरण कक्षासाठी घेण्यात आलेल्या खासगी शाळा वगळता इतर सर्व संस्थांनीच त्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी तयारी करावी असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र शाळा सुरु करण्याबाबत अद्याप सूचना न मिळाल्याने खाजगी शाळांचा गोंधळ उडाला आहे.
शिक्षकांच्या चाचण्यांचे अहवाल येण्यासाठी आणि इतर तयारीसाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असल्याचे अनेक शाळांचे म्हणणे आहे. म्हणूनच दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबतच्या सूचना वेळेवर मिळणे आवश्यक आहे.
दरम्यान, 10 वी, 12 वी च्या परीक्षांच्या तारखा आठवडाभरात जाहीर होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. दरवर्षी 12 वी च्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर 10 वी च्या परीक्षा मार्च महिन्यात होतात. मात्र कोरोना संकटामुळे बिघडलेलं शिक्षण व्यवस्थेचे चक्र पाहता यंदा बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यांत होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.