सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

याप्रकरणी न्यायालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत

Pune University (Photo Credits: Wiki Commons)

पुणे:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू नितीन करमळकर (Vice Chancellor Nitin Karmalkar) यांच्यासह पाच जणांविरोधात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. उपहारगृहातील जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे सांगत याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप या पाच जणांवर लावण्यात आला होता. या प्रकरणी न्यायलयाने कुलगुरू आणि इतर व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, तसेच  संजय चाकण, सुरेश भोसले, भुरसिंग राजपूत या पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय होतं नेमकं प्रकरण?

मागील  काही दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या उपहारगृहातील  जेवणात वारंवार अळ्या निघत असल्याने काही विद्यार्थ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलं होतं मात्र यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली अशी तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु :श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच पत्रकारांसह बारा विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांवर अन्यायकारकपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून बोलले जात होते. पुणे: अमनोरा शाळेने वाढीव फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला विद्यार्थ्यांच्या हातात, पालकांचा आरोप

विद्यार्थी आकाश भोसले आणि इतरांनी याविरोधात पुणे न्यायालयामध्ये धाव घेतली.याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान या सर्वांवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा कुलगुरुंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सखोल चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.