सातारा: प्रतापगडावर अफजल खान कबर परिसरात महिलेचा मृतदेह; फुटलेल्या बांगड्या, रक्ताचे डागही आढळले

पोलिसांनी या मृत्यूची नोंद सध्या आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. परंतू शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Corpses | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यभरात अनलॉक जाहीर झाल्यानंतर किल्ले प्रतापगड (Pratapgad) पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे गडावर पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, गडावर अफजल खान कबर (Afzal Khan Grave) परिसरात एका 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगिता सालेकर वय 50 वर्षे (वाडा कुंभरोशी) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला प्रतापकडावर आलेल्या पर्यटकांना शेंगा, बोरं विकून आपला उदरनिर्वाह करत होती, अशी प्राथमिक माहिती आहे. महाबळेश्वर पोलीस ठाणे (Mahabaleshwar Police Station) दप्तरी या प्रकरणी नोंद झाली आहे.

प्राप्त माहिती अशी की, संगिता सालेकर या दोन दिवसांपूर्वी गडावर जाते असे सांगून घरातून सकाळी बाहेर पडल्या परंतू, त्या परत आल्याच नाहीत. घरच्यांना संशय आल्याने त्यांनी शोधाशोध सुरु केली. परंतू, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांनी गावातील देवर्षी बाबाकडे कौल लावला. त्याने दिलेल्या दिशेला शोध घेऊनही पाहिले. काहीच पत्ता लागला नाही. अखेर घरच्यांनी पोलिसांशी संपर्क साधून संगिता सालेकर वाडा कुंभीरोशी येथून हरवल्याची तक्रार दिली. (हेही वाचा, Pratapgad Mashal Mahotsav 2020: कोरोना व्हायरस संकटामुळे किल्ले प्रतापगड मशाल महोत्सव साधेपणाने साजरा)

घरातील मंडळी व नातेवाईक संगिता सालेकर यांचा शोध घेतच होते. दरम्यान, पोलीस स्टेशनमधून फोन आला की, गडावर एका महिलेचा मृतदेह आढलला आहे. नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता हा मृतदेह संगिता सालेकर यांचाच असल्याची खात्री पटली. अफजल खान कबरीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर झाडाझुडपात हा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या मृत्यूची नोंद सध्या आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. परंतू शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.