Sanjay Raut on Kangana Ranaut: 'काही लाज लज्जा…माफी तरी मागावी', संजय राऊत यांची कंगना रनौत हिच्यावर टीका, भाजपच्या अध्यक्षांना 'मन की बात' करण्याचा सल्ला
तसेच, कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने भारतीय स्वातंत्र्याबाबत जे काही विधान केले आहे त्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 'मन की बात' करावी असा सल्लाही दिला आहे.
अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने भारतीय स्वातंत्र्याबाबत जे काही विधान केले आहे त्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 'मन की बात' करावी असा सल्लाही दिला आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने एका खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल अत्यंत वादग्रस्त, आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे तिच्यावर चौफेर टीका होत आहे. केंद्र सरकारने तिला दिलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कारही काढून घ्यावेत, अशी मागणी वाढत आहे. संजय राऊत यांनीही आज (12 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 'कंगनाला तरी काही लाज लज्जा…माफी तरी मागावी. ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर हा सगळा सोहळा झाला तिथे सर्वांनी टाळ्या वाजवल्या हा निर्लज्जपणाचा कळस आहे' असा संताप व्यक्त केला आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी तिच्यावर टीका केली आहे.
कंगना रनौत काय म्हणाली होती?
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना कंगना रनौत हिने विधान केले होते की, 'भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नव्हते तर ती भिक होती. भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले'. (हेही वाचा, Varun Gandhi On Kangana Ranaut: हा वेडेपणा की देशद्रोह? कंगना रनौत हिच्या विधानावर भाजप खासदार वरुण गांधी यांचा सवाल)
कंगना रनौत हिच्या विधानाची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने तिला दिलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावेत. तिच्या वक्तव्याबाबत पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 'मन की बात' करत आपले मत मांडायला हवे. फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कंगना रनौत हिच्या वक्तव्याबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी कंगना राणावतविरोधात कलम 504, 505आणि 124अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांत तशी तक्रार नोंदवली आहे.