Sanjay Raut on Ajit Pawar: अजित पवार यांच्याबद्दलच्या राजकीय चर्चांवर संजय राऊत यांचे महत्तवाचे भाष्य, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासोबतच्या चर्चेचाही दिला तपशील

मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. आपले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशीही बोलणे झाल्याची पुस्ती संजय राऊत यांनी जोडली आहे.

Sanjay Raut | (PC - ANI)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील काही आमदार भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन भाजपध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे देत आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'सारख्या इंग्रजी दैनिकाने तर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना घडामोडींवर स्वत: अजित पवार अथवा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. आपले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशीही बोलणे झाल्याची पुस्ती संजय राऊत यांनी जोडली आहे.

अजित पवार कोठेही जाणार नाहीत. त्यांचे नेतृत्व महाविकासआघाडीच्या माध्यमातूनच शिखरावर जाईल, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या कथीत आणि संभाव्य भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. काही आमदार पक्ष सोडून गेले याचा अर्थ पक्ष फुटला असा होत नाही. शिवसेनेसोबतचे काही आमदार फुटून गेले. मग पक्ष फुटला का? पक्ष अद्यापही एकसंघ आहे. महाविकास आघाडीही तशीच एकसंध आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांना फोडाफोडीवर भर द्यावा लागत असल्याचा चिमटाही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. (हेही वाचा, 'मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही', राष्ट्रवादी नेते Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण)

माझ्याकडे पक्की माहिती आहे. आज सकाळीच माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही बोलणे झाले. सर्व काही ठिक आहे. अजित पवार कोठेही जाणार नाहीत. अजित पवार हे महाविकासआघाडीचे एक प्रमुख नेते आणि आधारस्थंब आहेत. त्यांचे नेतृत्व महाविकासआघाडीच्या रुपानेच शिखरावर जाणार असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही आमदार फुटणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, या बातम्या निराधार आहेत. त्यात तथ्य नसल्याचेही राऊत म्हणाले.