Sanjay Raut Bail: मानहानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना जामीन मंजूर; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला आव्हान दिले. राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज दाखल केला होता.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI/X)

Sanjay Raut Bail: मुंबईतील सत्र न्यायालयाने शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात (Defamation Case) त्यांच्या शिक्षेला आव्हान दिले. राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आरती कुलकर्णी यांनी 26 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांना भारतीय दंड संहिता कलम 500 अंतर्गत मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. तसेच 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. मात्र, आजा संजय राऊत यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. (हेही वाचा -Sanjay Raut Granted Bail: मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर; शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगित)

मेधा सोमय्या यांनी दावा केला होता की, राऊत यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामाशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करत त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर मीडियामध्ये निराधार आणि बदनामीकारक आरोप केले होते. सोमय्या यांचे वकील लक्ष्मण कनाल यांनी सांगितले की, राऊत हे वैयक्तिकरित्या हजर असल्याने, आम्ही त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला नाही, त्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केला. (हेही वाचा -Sanjay Raut convicts in Defamation Case: डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी जिंकला संजय राऊत विरूद्ध मानहानीचा दावा; कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांच्या दंडाची शिक्षा)

काय आहे नेमकं प्रकरण?

मे 2022 मध्ये, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. कारण, संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीसाठीच्या निधीत शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात तक्रार नोंदवली की, संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात मीडियामध्ये दुर्भावनापूर्ण आणि अवाजवी विधाने केली. त्यानंतर संजय राऊत यांना दंडाधिकारी न्यायालयाने 26 सप्टेंबरला दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली होती. मात्र, संजय राऊत यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना या प्रकरणी जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.