Sanjay Raut Granted Bail: मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर; शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगित

दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवून 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी पुढे ढकलून त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला.

Sanjay Raut | (Photo Credit: X/ANI)

Sanjay Raut Granted Bail: भाजप नेत्याशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात (Defamation Case) दोषी ठरलेले शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना दंडाधिकारी न्यायालयाने 30 दिवसांसाठी शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचा आज मुंबईच्या माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निकाल जाहीर केला. दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवून 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी पुढे ढकलून त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला. (हेही वाचा -Sanjay Raut convicts in Defamation Case: डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी जिंकला संजय राऊत विरूद्ध मानहानीचा दावा; कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांच्या दंडाची शिक्षा)

या खटल्यातील सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, महानगर दंडाधिकारी (शिवडी न्यायालयाने) राज्यसभा खासदार संजय राऊत यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत दोषी ठरवले. तसेच 15 दिवसांच्या तुरुंगवासासह 25,000 रुपये दंडही ठोठावला. न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर राऊत यांच्या वकिलाने शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आणि जामीन मंजूर करण्यासाठी दोन याचिका दाखल केल्या. दरम्यान, काही तासांतचं न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. (हेही वाचा - Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case: 'न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालयं'; अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोषी ठरल्यानंतरही संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम; 'भाजपा' वर हल्लाबोल)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मेधा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, राऊत यांनी मेधा सोमय्या आणि त्यांची एनजीओ युवा प्रतिष्ठानवर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. संजय राऊत म्हणाले की त्यांनी काही अधिकृत नोंदींच्या आधारे काही प्रश्न उपस्थित केले होते. तलेच शौचालय बांधकामाच्या मुद्द्यावर शंका उपस्थित केली होती, ज्याला सत्ताधारी महायुती आघाडीच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला होता.