राज्यसभा खासदार संजय राऊत यांची शिवसेना संसदीय दल नेतेपदी नियुक्ती
तेव्हापासून, शिवसेना-भाजपमध्ये पहिल्यासारखे सख्य राहिले नाही. दोन्ही पक्षात सतत संघर्ष असतो.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून याबाबत कल्पना दिली. काही दिवसांपूर्वीच एनडीए प्रणीत मोदी सरकारवर विरोधकांनी अविश्वासाचा ठराव आणला होता. अविश्वास प्रस्तावावेळी शिवसेना खासदारात व्हीपवरुन संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अशा घोळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, राज्यसभेतील ३ आणि लोकसभेतील १६ असे मिळून शिवसेनेचे केंद्रात १९ खासदार आहेत. त्यातच शिवसेना सत्तेतही सहभागी आहे आणि एनडीएचाही घटक पक्ष आहे. असे असले तरी, शिवसेना भाजप आणि सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. २०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युती तुटली. तेव्हापासून, शिवसेना-भाजपमध्ये पहिल्यासारखे सख्य राहिले नाही. दोन्ही पक्षात सतत संघर्ष असतो.
शिवसेना भाजपमधील संघर्ष विचारात घेता. तसेच, इतर पक्षातील आयारामांना नेहमी दरवाजा उघडा ठेवण्याचे भाजपचे अलिकडील काळातील स्वभाववैशिष्ट्य पाहिले असता, भाजप हा शिवसेनेचे खासदार गळाला लाऊ शकतो, अशी कुजबुज राजधानी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. त्याची कुणकुण पक्षनेतृत्वालाही लागली होती. त्यामुळे अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे समजते.