Sangli Flood Update: 16 ऑगस्टपासून सुरु होणार सांगलीतील शाळा, विद्यार्थ्यांना 'शालेय किट' देण्याचा सरकारकडे प्रस्ताव
पूरामुळे येथील विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले असल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांना एक 'शालेय किट' देखील देण्याचा विचार आहे
गेल्या 10 दिवसांपासून पूराने वेढलेल्या सांगली (Sangli) जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच अजून एक दिलासा देणारी बातमी म्हणजे सांगलीतील शाळाही उद्यापासून सुरु होणार आहेत. पावसामुळे गेले 10 दिवस बंद असलेल्या सांगलीतील शाळांची पहिली घंटा 16 ऑगस्टला वाजणार आहे. पूरामुळे येथील विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले असल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांना एक 'शालेय किट' देखील देण्याचा विचार आहे. ज्यात शाळेसंबंधी, अभ्यासासंबधीच्या गोष्टी असतील, अशी माहिती डॉ. अभिजीत चौधरी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
गेला आठवडाभर आपण कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) मधील भयावह परिस्थिती पाहत तर तेथील कित्येक लोक, शाळकरी मुलं, वृद्ध ते परिस्थिती अनुभवत होते. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती काय असेल याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. ज्यात लोकांची घरच्या घरं वाहून गेली त्यात या शाळकरी विद्यार्थ्यांचे शालेय गोष्टी तरी कुठून शिल्लक राहतील हो.
आपली वह्या-पुस्तके वाहून गेली, भिजून गेल्याचे या मुलांनी आपल्या डोळ्यांनी बघितले. अशा त्या धक्क्यातून सावरत आता ही मुले उद्यापासून पुन्हा शाळेत जाणार आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी या मुलांना पुस्तके, वह्या, पेन, कंपास यांसारख्या शालेय गोष्टींचे किट देण्याचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत पाठविण्यात येईल आणि लवकरच या प्रस्तावाला मान्यता घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
यासोबतच पूरग्रस्त भागात मदत व पुनर्वसनासाठी 4 हजार 708 कोटी 25 लाख तर रुपये, तर कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 हजार 105 कोटी 67 लाख असे एकूण 6 हजार 913 कोटी 92 लाख रुपये सरकार खर्च करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
तसेच शाळांच्या इमारती आणि पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 125 कोटींची मदत दिली जाणार आहे. या मदतीचे योग्य पद्धतीने वाटप आणि पाहणीसाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका तालुक्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान सरकार व्यतिरिक्त अनेक नागरिक, सामाजिक संथ, देवस्थाने, शैक्षणिक संस्था, चित्रपटसृष्टीमधील कलाकार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.