Inter-Caste Marriage: आंतरजातीय विवाहामुळे नंदीवाले समाजातील 150 कुटुंबांवर बहिष्कार; पंचांविरुद्ध गुन्हे दाखल
या समाजातील काही कुटुंबातील तरुणांनी आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केल्याच्या कारणावरुन समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. या प्रकरणाची माहिती समजताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर येथील नंदीवाले समाजातील 150 दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आले. या समाजातील काही कुटुंबातील तरुणांनी आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केल्याच्या कारणावरुन समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. या प्रकरणाची माहिती समजताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. त्यानंतर बहिष्काराची शिक्षा देणाऱ्या सहा पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश भोसले (इस्लामपूर, वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पलूस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजच्या बदलत्या काळातही एखाद्या समाजात अशा प्रकारची भूमिका घेतली जाते याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पलुस पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन नंदीवाले समाजातील पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार (दोघेही रा. इस्लामपूर), शामराव देशमुख, अशोक भोसले (रा. दुधोंडी, किसन इंगवले रा.जुळेवाडी) आणि विलास मोकाशी (रा. निमणी) या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, नंदीवाले समाज महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला आहे. या समाजातील अनेक तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा तरुणांना या समाजातील पंचांनी बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे या तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना समाजातील सुख:दु:खात बोलावले जात नाही. (हेही वाचा, AIADMK Dalit MLA A Prabhu Marriage With Brahmin Girl: अन्नाद्रमुक आमदार ए. प्रभु यांचे ब्राह्मण मुलीसोबत लग्न, जातीयतेला मुठमाती देत 'आंतरजातीय विवाह')
दरम्यान, जातपंचायतीने केलेल्या कारवाईविरोधात बहिष्कृत असलेल्या काही तरुणांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेशी संपर्क साधला. तसेच, हा बहिष्कार उठविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. त्यानंतर अंनिसने या समाजातील पंचाशी संपर्क साधला. पंचांनीही झालेल्या चर्चेतून हा बहिष्कार मागे घेण्याचे मान्य केले. मात्र, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे पार पडलेल्या 9 जानेवारीच्या जात पंचायत बैठकीत मात्र हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय कामय ठेवला. तसेच, तो जाहीरही केला. त्यामुळे या पंचाविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पीडित प्रकाश भोसले यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.