IPL Auction 2025 Live

Sangli Bandh: संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांच्याकडून उद्या सांगली बंदचे आवाहन

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली (Sangli) येथील माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सातारा शहरात जाहिर बंद पाळण्यात आला होता.

Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली (Sangli) येथील माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सातारा शहरात जाहिर बंद पाळण्यात आला होता. यातच उद्या 17 जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगली बंदचे (Sangli Bandh) आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना पदावरुन हटवावे, अन्यथा हे बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभाजी भिडे यांनी दिला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे भोसले समर्थकांनी तर राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सातारा बंद पुकारले असून सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. साताऱ्यातील मुख्य बाजारपेठाही बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थाही तुरळक प्रमाणात सुरू आहेत. यातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे अवाहन केले आहे. दरम्यान, संभाजी भिडे म्हणाले की, संजय राऊत यांनी उदयनराजें यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभाजी भिडे यांनी दिला आहे. हे देखील वाचा- 'छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले तर, जीभ कापून टाकू' नारायण राणे यांचा संजय राऊत यांना इशारा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार झाले. यात संजय राऊत यांनी मोलाचा वाटा उचलला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रदर्शित झाल्यापासून राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली आहे. याआधी नारायण राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.