धक्कादायक! कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे दुकान बंद झाल्याने उस्मानाबादेत सलून मालकाची आत्महत्या

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. या कडक निर्बंधामुळे उस्मानाबाद (Osmanabad) येथील एका सलून मालकाने (Hair Cutting Salon) दुकान बंद ठेवावे लागत असल्याने नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मनोज झेंडे असे या मृत सलून मालकाचे नाव आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने दैनंदिन सलून व्यवसायावर मनोज उदरनिर्वाह करायचा. मात्र कोरोनामुळे दुकान बंद झाल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. मागील वर्षीच एका मुलीचे लग्न केल्याने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक देणी वाढल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.हेदेखील वाचा- Lockdown करण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा, नीलम गो-हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आत्महत्या करण्याअगोदर मनोजने सुसाइड नोट लिहून त्यामध्ये आपले आत्महत्या मागचे कारण सांगितले आहे. मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. मागील वर्षी मोठ्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यातच आलेले हे मिनी लॉकडाऊन सर्वांसाठी त्रासदायक आणि आर्थिकदृष्ट्या संकटात टाकणारे आहे. त्यामुळे आधीच डोक्यावर कर्जाचा ओझं अन् आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे.

आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काहींचे मत 2 आठवडे तर काहींचे 3 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यावर होते असे महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. राज्यात मागील 24 तासांत 63 हजार 294 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.