सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातयं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय" असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपली. यात मनसुख हिरेन प्रकरण (Mansukh Hiren Case) प्रचंड गाजले. यात क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे नाव प्रकर्षाने समोर आले. दरम्यान विरोधकांच्या मागणीनंतर सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यात "सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय" असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही." पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनसुख हिरण मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही." असेही ते म्हणाले.हेदेखील वाचा- Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांची बदली; महाविकासआघाडी सरकार कोणासही पाठिशी घालणार नाही- अनिल देशमुख
तसेच "आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेण्याचं काम सरकारचं आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नावं आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही करणार नाही" असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान "महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्म परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही." , असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.