Anil Deshmukh: सचिन वाझे प्रकरण घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

एपीआय सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) आता अधिक गुंतागुंतीचे तसेच अधिक खोलवर जाताना दिसत आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळातही अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर सरकार आणि पोलीस दलही सतर्क झाले आहे. याच प्रकरणात आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही राजीनामा घेतला जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अर्थात, महाविकासाघाडी ​सरकारमधील कोणताही मंत्री अथवा नेत्याने याबाबत स्पष्ट भाष्य केले नाही. असे असले तरी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, वायबी सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधी पक्ष फ्रंटवर सरकार बॅकफूटवर

राज्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या वेळी काहीसे वादळी ठरले. अधिवेशनात विरोधी पक्ष पूर्णपणे फ्रंटवर येऊन बाजू मांडताना दिसला. तर सरकारला काही मुद्दयांवर बॅकफूटला जावे लागल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एपीआय सचिन वाझे यांची बदली करण्याची घोषणा सरकारला करावी लागली. पूजा चव्हाण आत्महत्या आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण या दोन्ही मुद्द्यांवर सरकारला काहीसे बचावात्मक पवित्र्यात उभे राहावे लागले.

गेल्या काही काळापासून महाविकासआघाडी सरकारला अडचणीत आणली गेलेली जेवढीपण प्रकरणे पाहायला मिळाली. ती सर्व प्रकरणे गृहखात्याशी संबंधित राहिली आहेत. त्याचा थेट राज्य सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांची बदली तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Sachin Vaze Case: सचीन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री वकिली का करतात? भाजप आमदार नितेश राणे यांची शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप)

दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याबाबतची शक्यता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक मुंबई येथील वाय बी सेंटर येथे पार पडत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif