Shiv Sena On PM Narendra Modi Speech: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'

PM Narendra Modi | (Photo Credits: YouTube)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी (13 ऑक्टोबर) केलेल्या भाषणावरुन शिवसेनेने खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात (PM Narendra Modi Speech) 'डिसलाईक' करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करुन दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजाने देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आणच्या त्यांना शुभेच्छा! अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) टोलेबाजी करण्यात आली आहे.

'तेजोपुरुष' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात दै. सामनामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्टाला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. यांचे भाषण छोटेखनी, पण प्रभावी होते. त्यात 'डिसलाईक' करण्यासारखे काहीच नव्हते, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना पुढे, देश मागे हेच वास्तव; केंद्र सरकारचे फक्त वादे, दावे- शिवसेना)

पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत. हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या. तर कित्येक जण आस लाऊन टीव्ही समोर बसले होते पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कोणालाही धक्का दिला नाही व कोणास तपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करु नये, असा इशाराच त्यांनी वडीलकीच्या नात्याने दिला.

मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही एक वेगळेच तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरु केलेली दिसते. मंगळवारच्या त्यांच्या संबोधनात काही वेळा 'रामचरित मानस'चा संदर्भ त्याच भावनेतून आलेला दिसला. कोरोनाचा धोका समजण्यासाठी पंतप्रधानांनी 'रामचरित मानस'चा संदर्भ घेतला. लॉकडाऊनच्या सुरुवातीला मोदींनी 'महाभारत' काळात देशाना नेले होते. महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी 18 दिवस लागले होते. कोरोनाला हरवण्यासाठी 22 दिवस लागतील, असा शंख मोदींनी फुंकला होता. पण सात महिन्यांनतरही हे युद्ध संपले नसल्याचा शंख नव्याने फुंकण्यात आला आहे, असेही सामनात म्हटले आहे.