विक्रोळी-कांजूरमार्ग परिसरात घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची पसरली अफवा आणि मग जे झाले ते ऐकून तुम्हीही माराल डोक्यावर हात
त्यामुळे लोकांनी त्या जागेवर झोपड्या बांधण्यासाठी जे काही केले ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत आपलही छोटंस का होईना पण हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी माणूस रात्रं-दिवस कष्ट करतो. पै अन् पै जमा करतो. कारण सध्या मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत घर घेणे हे सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्याने ते बेरोजगार झाले. त्यामुळे जेथे खायचे वांदे तिथे घर कसे घेणार असा मोठा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मुंबईत घरे बांधण्यासाठी मोफत जमीन मिळत आहे अशी बातमी ऐकायला मिळाली तर! तुमच्या पायाखालची जमिन सरकेल. असाच प्रकार घडला विक्रोळी-कांजूरमार्ग (Vikroli-Kanjurmarg) परिसरात.... येथे राज्य सरकारच्या भूखंडावर घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. त्यामुळे लोकांनी त्या जागेवर झोपड्या बांधण्यासाठी जे काही केले ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
मटाने दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या दरम्यान असलेल्या भागात सरकारी मालकीचे दोन मोठे भूखंड आहेत. या भूखंडांवर सरकारकडून बेघरांना फुकटात जागा दिली जात असल्याची अफवा पसरली. सोशल मिडियावरही ही बातमी प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर लोकांची ही जागा घेण्यासाठी एकच धांदल उडाली. लोकांनी त्या जागेवर जाऊन आपापल्या जागा बुक करण्यासाठी त्या जागेवर रंगाने मार्क करुन ठेवले. ज्यामुळे ती जागा कोणीही बळकावणार नाही. ही बाब लक्षात येताच, पालिका आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून रविवारी या झोपड्यांवर कारवाई केली. हेदेखील वाचा- Mumbai Rains Update: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी, आजही दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता- IMD
हे बातमी थोडी विचित्र वाटत असेल पण असे प्रत्यक्षात घडले आहे. मुंबईसह अनेक भागात महाराष्ट्राबाहेरून आलेल्या लोकांचे लोंढे प्रचंड वाढत चालले आहे. यामुळे जागा अपू-या पडत आहेत. तसेच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यात पार्किंगची समस्याही वाढत आहे. अशा स्थितीत मोफत घरांसाठी जागा मिळणे ही सर्वांसाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. मात्र सद्य परिस्थितीत असे होणे अशक्य आहे. ही गोष्ट नागरिकांनी लक्षात घ्यावे.
तसेच कोणत्याही बातमीची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. या एका अफवेमुळे झालेल्या प्रचंड गर्दीमुळे काही अनुचित प्रकारही घडला असता. मात्र पालिकेच्या प्रसंगावधानामुळे ही परिस्थितीत ताबडतोब सावरण्यात आली.