RSS Reshimbagh Memorial Place: शिवसेना आणि आरएसएस विचारधारा एकच: एकनाथ शिंदे
शिवसेना आणि भाजप यांच्या असलेले पक्षांच्या नावातील अंतरही कमी होते की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना पक्षाचे विद्यमान प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार एकच आहेत, अशी भूमिका व्यक्त केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. काय म्हणाले शिंदे? घ्या जाणून
शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) विचार एकच आहेत. राष्ट्रसेवेतील संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाहीत. संघाने नेहमी जोडण्याचे काम केले. त्यांनी कधीही तोडण्याचे काम केले नाही. संघाने केलेल्या मदतीमुळेच आम्हाला विधानसभा निवडणुकीत इतके मोठे यश आले, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढले आहेत. भाजप (BJP) आणि महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना आमदारांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हेडगेवार स्मृती भवन परिसरास भेट दिली. या भेटीदरम्यान, शिंदे बोलत होते. दरम्यान, या भेटीसाठी आरएसएस (RSS) कडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासही निमंत्रण होते. मात्र, त्यांच्या पक्षाचा एक आमदार वगळता कोणीही तिकडे फिरकले नाही.
शिवसेना, भाजप आमदारांना आरएसएसकडून मार्गदर्शन
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Maharashtra Assembly Winter Session 2024) येथे पार पडते. या अधिवेशनादरम्यान, भाजपचे आमदार नागपूर येथील रेशीमबाग परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात. भाजपसोबतच इतरही मित्रपक्षांनी या स्थळाला भेट द्यावी, असा संघाचा प्रयत्न असतो. अधिवेशन काळातील एका सकाळी हे आमदार या ठिकाणी जमतात. हेगडेवारांच्या समाधीचे दर्शन घेतात. या वेळी संघाचे वरिष्ठ या आमदारांना मार्गदर्शन करतात. त्याला काही लोक बौद्धिक असेही संबोधत असतात. याच निमित्ताने शिवसेना आमदार येथे आले असता शिंदे यांनी हे विधान केले. (हेही वाचा, Rahul Gandhi in Lok Sabha: संविधानाचा गौरव करत आरएसएस आणि सावरकर मुद्द्यावरुन राहुल गांधी बरसले)
माझ्यावर संघाचे संस्कार: एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले नागपूर येथील रेशीमबागेत मी पहिल्यांदाच आलो नाही. या आधीही मी अनेक वेळा येथे आलो आहे. खरे तर माझी सुरुवातच आरएसएसमधून झाली आहे. बालपणी मी अनेकदा संघाच्या शाखेमध्ये जात असे. त्यामुळे माझ्यावर संघाचे संस्कार आहेत. राष्ट्रसेवेमध्ये संघाचे मोठे काम आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे शिवसेना आणि आरएसएस हे एकच आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
दादांनी रेशीमबागेत यावे : गुलाबराव पाटील
अजित पवार यांनी रेशीमबागेत यायला हरकत नाही. या निवडणुकीत आरएसएसने पडद्यामागे राहून नव्हे तर पडद्यावर येऊन काम केले. इतकेच नव्हे तर व्होट जिहादला केवळ उत्तरच नव्हे तर महाउत्तर दिले आहे, असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तर याच गटाचे दुसरे मंत्री दादा भुसे यांनीही शिवसेना आणि आरएसएस यांची विचारधारा एक असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार यांचे संघापासून अंतर
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही नागपूर येथील रेशीमबागेत निमंत्रण होते. मात्र, यंदाही अजित पवार यांनी आरएसएसपासून काहीसे अंतर बाळगल्याचे पाहायला मिळाले. पाठिमागील वर्षीही त्यांना आणि त्यांच्या पक्षाला निमंत्रण होते. मात्र, स्वत: अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील एक अपवाद वगळता कोणताही आमदार तिकडे फिरकला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)