RS Election 2022 In Maharashtra: ED, CBI चा धाक दाखवत अपक्षांवर BJP कडून दबाव टाकण्याचा प्रयत्न; Sanjay Raut यांचा आरोप

ईडी- सीबीआय केंद्राकडे असली तरीही 50 वर्षांचा निवडणूकीचा अनुभव आमच्याकडे आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात यंदा 24 वर्षांची राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) बिनविरोध करण्याची परंपरा मोडीत काढत 10 जूनला सहा जागांसाठी 7 उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशा लढतीमध्ये 'कोल्हापूर' हे निवडणूकीचं केंद्रबिंदू झालं आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) विरूद्ध भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) अशी सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. पण यासाठी घोडेबाजार होत असल्याचा आणि ईडी-सीबीआय सारख्या केंद्राच्या यंत्रणांचा दबाव आणून अपक्षांना धमकावलं जात असल्याचा आरोप आज शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

अपक्षांना जुनी प्रकरणं उकरून काढत त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे संजय राऊत म्हणाले. पण अशा परिस्थितीमध्येही भाजपाकडून पैशांचं आमिष दाखवलं जात आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार आहे असा विश्वास व्यक्त करताना हे पैसे भाजपाने चांगल्या सामाजिक कार्यासाठी वापरावेत असा खोचक सल्ला देखील दिला आहे. हे देखील नक्की वाचा: Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, शिवसेना, भाजप, काँग्रेस नेत्यांकडून दणादण प्रतिक्रिया .

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ईडी- सीबीआय केंद्राकडे असली तरीही 50 वर्षांचा निवडणूकीचा अनुभव आमच्याकडे आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान कोणाची साथ कोणाला आहे याचा उलगडा 10 जूनला होणारच आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही कालपर्यंत ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला होता पण आता लढत अटळ असल्याचं चित्र असल्याने आम्ही ती लढायला आणि जिंकायला सज्ज असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.