चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार, 'या' सेवांना मिळणार परवानगी
यात नागरिकांना कोरोना नियमांचे आणि त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यांतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता त्यानुसार, निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान चंद्रपूर (Chandrapur) जिल्हयात येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार, अत्यावश्यक तसेच अन्य सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. यात नागरिकांना कोरोना नियमांचे आणि त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे.
संपूर्ण जिल्हयातील अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची एकल दुकाने, आस्थापना (मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सुपर बाजार, सलून, स्पा-जिम इत्यादी वगळून) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. सदर एकल दुकाने, आस्थापना शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी संपुर्णत: बंद ठेवण्यात यावी.हेदेखील वाचा- Maharashtra Unlock: अनलॉक वरुन ठाकरे सरकारचा यूटर्न, MVA सरकार स्वत:हून पडेल त्यासाठी ऑपरेशन लोटसची गरज नाही-BJP
जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवा, वस्तू तसेच अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा, वस्तू ई-कामर्सच्या माध्यमातून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत वितरीत करण्यास परवानगी राहील. नागरिकांना दुपारी 3 या वेळेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणी प्रसंग तसेच घरपोच सेवा या कारणांशिवाय बाहेर येण्या-जाण्यावर निर्बंध असतील. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 14,152 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 289 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 58 लाख 5 हजार 565 वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण 55 लाख 7 हजार 58 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 1 लाख 96 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.