Republic Day Tableau Parade 2025: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, 15 राज्यं, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश

आलटून पालटून राज्यांना संधी दिली जाते त्यामुळे यंदा कर्तव्यपथावर महाराष्ट्र नसेल पण दुसरीकडे असणर्‍या चित्ररथामध्ये महाराष्ट्र असेल आम्ही पुन्हा प्रयत्न करून पाहू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Republic Day parade, Tableau (PC - ANI)

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्ली मध्ये कर्तव्यपथावर (Kartavya Path) सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्यासाठी चित्ररथांकरिता (Republic Day Tableau Parade) 15 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश झाला आहे. परंतू त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. दरवर्षी विविध थीम वर चित्ररथ असतात. त्यामध्ये मागील अनेक वर्ष महाराष्ट्राचा देखील चित्ररथ आकर्षण असायचा. विठू माऊलीचा सोहळा ते शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचा चित्ररथ अशा विविध थीमवर महाराष्ट्राने चित्ररथ सादर केला आहे. पण यंदा अद्याप महाराष्ट्राचं निवड झालेल्या यादीमध्ये नाव नाही.

कोणत्या 15 राज्यं, केंद्रशासित प्रदेशांची निवड झाली?

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांच्या चित्ररथाला मंजुरी मिळाली आहे. सोबतच 11 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

3 वर्षामध्ये एकदा संधी मिळणार

प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये चित्ररथ निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये आता , प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम संरक्षण मंत्रालयाने केला आहे. यामुळे वाद कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र यासोबत संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीला चित्ररथ आवडला पाहिजे अशी देखिल अट आहे.

दरम्यान मागील वर्षी देखील महाराष्ट्राच्या चित्ररथाला आयत्या वेळी मंजुरी दिल्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 4 वर्ष महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. आलटून पालटून राज्यांना संधी दिली जाते  त्यामुळे यंदा कर्तव्यपथावर महाराष्ट्र नसेल पण दुसरीकडे असणर्‍या चित्ररथामध्ये महाराष्ट्र असेल आम्ही पुन्हा प्रयत्न करून पाहू असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.