मुंबईमध्ये Remdesivir चा काळाबाजार, 40 ते 50 पट जास्त किंमतीने विकली जात आहेत औषधे; मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे कडक कारवाई करण्याचे आदेश
सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणू सकारात्मक रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी जीवनरक्षक औषध म्हणून वापरले जाणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. सध्या या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 900 रुपये किंमतीचे हे इंजेक्शन 40,000 ते 50,000 रुपयांना विकले जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिविर इंजेक्शन इतक्या मोठ्या किंमतीवर विकले जात असल्याची कोणतीही तक्रार मिळालेली नाही. आता मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात मंत्री शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अशा कृतींवर संयुक्त कारवाई करून या प्रकरणाची चौकशी करावी, असे आरोग्य तज्ज्ञांनीही सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी शिंगणे यांनी दिल्या. सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 50 ते 60 हजार इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा फारसा तुटवडा नाही. राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठ्यापैकी 80 टक्के साठा हा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यामागचे नेमके कारण काय? बाळासाहेब थोरात यांनी दिली अशी माहिती)
दरम्यान, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.