Jaish-e-Mohammed कडून नागपूर येथील RSS मुख्यालय आणि हेडगेवार भवनची रेकी; गुप्तचर संस्थेचा अहवाल, सुरक्षा वाढवली

शहरातील रेशीमबाग परिसरातील आरएसएस मुख्यलय आणि जवळच असलेला डॉ हेडगेवार स्मृती मंदिर (Dr. Hedgewar Bhavan) परिसरासह अनेक संवेदनशील ठिकाणांचीही रेकी करण्यात आली आहे

RSS Headquarters | (File Photo)

नागपूर (Nagpur) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (RSS Headquarters) असलेल्या इमारतीची जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेकडून रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील रेशीमबाग परिसरातील आरएसएस मुख्यलय आणि जवळच असलेला डॉ हेडगेवार स्मृती मंदिर (Dr. Hedgewar Bhavan) परिसरासह अनेक संवेदनशील ठिकाणांचीही रेकी करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती नागपूर पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्याची माहिती आहे. ही माहिती मिळताच नागपूर येथील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही यावृत्ताला दुजोरा दिला आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झालीआहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आदी ठिकाणी सुरक्षा अधिक कडक केली. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून नागपूरमधील कोणकोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी उघड केली नाही. मात्र, या प्रकरणात युपीए कायद्यांतर्गत एक गुन्हा मात्र दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Malegaon Blast Case: 'ATC ने माझ्यावर योगी आदित्यनाथ आणि RSS च्या लोकांची नावे घेण्यासाठी दबाव टाकला'; मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराची कोर्टात माहिती)

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दहशतवादी गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे राजकीय नेते आणि इतरही काही ठिकाणी बॉम्बस्फोटासारख्या अथवा इतरही काही घातक योजना आखू शकतात. त्यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने हाय अलर्ट जारी करत म्हटले आहे की, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रहदारी-गर्दीचा परीसर, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाच्या संस्था आणि हायप्रोफाईल नेत्यांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.