Refinery Project in Konkan: धोपेश्वर ग्रामसभेत स्थानिक प्रकल्पाच्या विरोधात असल्याचं चित्र; पहा मतदानाचा आकडा

ग्रामसभेत या रिफायनरीला विरोध करण्याच्या बाजूने 466 तर समर्थक म्हणून 144 जणांनी मतं टाकली आहेत तर 23 जण तटस्थ होते.

Refinery | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

कोकणामधील रिफायरी प्रकल्प (Refinery Project) मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नाणार येथून तो रद्द झाल्यानंतर कोकणात इतरत्र त्याला हलवण्याची तयारी सुरू झाली आहे. अशामध्ये आता हा प्रकल्प राजापूर तालुका मधील धोपेश्वर (Dhopeshwar) येथे हलवण्याच्या  दृष्टीने हालचाली सुरू आहे. पण तत्पूर्वी स्थानिकांचा कौल पाहिला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये या रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असल्याचं पहायला मिळालं आहे. ग्रामसभेत या रिफायनरीला विरोध करण्याच्या बाजूने 466 तर समर्थक म्हणून 144 जणांनी मतं टाकली आहेत तर 23 जण तटस्थ होते.

काही दिवसांपूर्वी कोकण दौर्‍यावर असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थकांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना त्यांनी कंपनीला आधी स्थानिकांशी बोलू द्या. त्यांच्यासोबत फायदे-तोटे जाणून घ्या, स्थलांतरित कसं कुठे होणार? रोजगाराच्या संधी काय असतील? याची माहिती घ्या नंतर आपण बोलू अशी भूमिका घेतली. मात्र कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने प्रकल्प आणण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहित पंतप्रधानांना पर्यायी जागेचा शोध घेत असल्याचं म्हटलं आहे. मात्र अद्याप नाणार नंतर दुसर्‍या कोणत्याही जागेवर सरकारचं शिक्कामोर्तब झालेले नाही. आज धोपेश्वरच्या ग्रामसभेतहि झालेल्या मतदानामध्ये ग्रामस्थ प्रकल्पाच्या बाजूने नसल्याने या जागेवरील आशा देखील मावळत असल्याचं चित्रं आहे.