IPL Auction 2025 Live

अरे बापरे! मोबाइल चोरीसाठी रितसर भरती आणि ट्रेनिंगसुद्धा; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

या मुलांना मोबाइल कसा चोरावा, चोरी करताना जर पकडले गेले तर, रडण्याचे नाटक कसे करावे. हे शिकवलेले असते. हे प्रशिक्षण इतके सखोल असते की, गर्दीत वरच्या खिशातील, पँटच्या खिशातील, बॅगमधील मोबाइल कसा चोरायचा याचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.

Mobile Theft | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Recruitment And Deep Training For Mobile Theft: सरकारी, खासगी संस्था, कंपन्यांमध्ये कामगार, कर्मचारी भरती (Recruitment) आपल्यासाठी नवे नाही. त्यासाठी जाहिराती पाहायला मिळणे हेही नवे नाही. पण, धक्कादायक आहे मुंबईतील यलो गेट पोलिसांनी (Yellow Gate Police) उघडकीस आणलेले प्रकरण. काही गुन्हेगारी टोळ्यांनी चक्क मोबाइल चोरीसाठी (Mobile Thief) अल्पवयीन मुलांची भरती केल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. गर्दीमध्ये लोकांचे मोबाइल कसे चोरावेत याचे रितसर प्रशिक्षण या मुलांना देण्यात येते. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, चार मुलांना अटक केले आहे. ही सर्व मुले झारखंड (Jharkhand) येथील आहेत. या टोळीचा म्होरक्या कोण, या टोळीने आतापर्यंत कुठे आणि किती लोकांचे मोबाइल लंपास केले आहेत, याबबत पोलीस तपास करत आहेत.

मुंबईतील माझगाव प्रिन्सेस डॉक परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोबाइल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. तसेच, मोबाइलचोरीसाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा संशयही व्यक्त होत होता. दरम्यान, यलो गेट पोलिसांनी पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदशनाखाली आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा कपिले यांच्या पथकासह सापळा रचला. या वेळी काही अल्पवयीन मुले गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद फिराताना आढळले. पोलिसांनी त्यातील काहींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही मुले मोबाइल चोर असल्याचे पुढे आले.

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशी आणखी धक्कादायक माहिती पुढे आली. ही सर्व मुले जोगेश्वरी येथे भाड्याच्या रखोलीत राहतात. ही खोली त्यांच्या टोळीप्रमुखाने घेतलेली असते. महत्त्वाचे म्हणजे या मुलांची राहण्याचे ठिकाण सतत बदलले जाते. ही सर्व मुले 12 ते 15 वयोगटातील आहेत. या मुलांना मोबाइल कसा चोरावा, चोरी करताना जर पकडले गेले तर, रडण्याचे नाटक कसे करावे. हे शिकवलेले असते. हे प्रशिक्षण इतके सखोल असते की, गर्दीत वरच्या खिशातील, पँटच्या खिशातील, बॅगमधील मोबाइल कसा चोरायचा याचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. पोलिसांनी ही मुले राहात असलेल्या खोलीवर छापा मारला असता त्यांना चोरी केलेले 30 मोबाइल सापडले.

प्राप्त माहिती अशी की, या मुलांचे पालक झारखंड येथे आहेत. मुंबईत नोकरी लावतो असे आमिष या मुलांच्या पालकांना दाखवले जाते. त्यानंतर या मलांना मंबईत आणले जाते. विशेष म्हणजे या मुलांना देशभरातील अनेक राज्यांमध्ये, शहरांमध्ये चोरीच्या मोहिमेवर पाठविण्यात येते. चोरीच्या कामासाठी आणलेली सर्व मुले ही गरीब घरातील आहेत. या मुलांच्या पालकांना महिना चार ते पाच हजार रुपये दिले जातात. तर, मुलांना कमिशन मिळते. हे कमीशन मोबाइल किती महागडा आहे त्यावर अवलंबून असते. (हेही वाचा, पत्नी, धनप्राप्तीसाठी तरुणाला विवस्त्र करुन पूजा; नंदूरबारमध्ये जादूटोणा)

मोबाइल चोरीसाठी टोळीप्रमुखाकडे राज्यांतील सण उत्सवांची बारीक माहिती असते. जसे की, गणपती उत्सवाह ही मुले मुंबई, महाराष्ट्रात काम करतात. तर, नवरात्रोत्सवात या मुलांना गुजरातमध्ये पाठवले जाते. अशाच पद्धतीने मुलांची पाठवणी देशभरात केली जाते. दरम्यान, चोरी केलेले मोबाइल बांग्लादेशात विकले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.