PMC खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी! बँकेतून काढता येणार 50,000 रुपये
ही बातमी पीएमसी खातेधारकांसाठी दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे.
PMC बँक घोटाळा प्रकरण हे दिवसेंदिवस गंभीर रुप घेत असून अजूनपर्यंत अपेक्षित निकाल न लागल्याकारणाने आतापर्यंत PMC च्या 5 खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. तर काही खातेदारांनी मंगळवारी (22 ऑक्टोबर) ला आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यामुळे ही तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकने (RBI) पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा ही 50,000 रुपयांपर्यंत केली आहे. ही बातमी पीएमसी खातेधारकांसाठी दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असताना पीएमसी बँकेबाबत कोणताही निर्णय न लागत असल्याने या बँकेचे अनेक खातेदार चिंतेत होते. त्यांची ही चिंता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 14 ऑक्टोबर रोजी हिच रक्कम 10,000 वरुन 40,000 रुपये करण्यात आली होती. मात्र ही रक्कम कमी असून अडचणीच्या वेळी योग्य ती रक्कम न मिळाल्या कारणाने मुलूंडमधील एका खातेधाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याची गंभीर दखल घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट द्वारा रक्कम वाढविल्याचे जाहीर केले.
हेदेखील वाचा- PMC Bank Crisis Update: येत्या 30 ऑक्टोबरला RBI जाहीर करणार PMC बाबतचा निर्णय; पत्रकार परिषदेत करणार घोषणा
मात्र ही रक्कम काही अटींवरच मिळणार आहेत. वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी खातेदाराला ही रक्कम काढता येणार आहे. पीएमसी बँकेमधून रक्कम काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला आणि कित्येक खातेदारांचा जीव टांगणीला लावलेल्या PMC बँके बाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 30 ऑक्टोबरला जाहीर करण्याची शक्यता आहे. लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, RBI ने आझाद मैदानात आंदोलन करणा-या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण 30 ऑक्टोबरला निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.