Ratnagiri News: रत्नागिरी तालुक्यामध्ये शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Ratnagiri News: रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील फणसवळे कोंड गावच्या शेजारीच असलेल्या शीळ धरण(Sheel Dam)च्या नदीपात्रात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू (children died) झाला आहे. सोमवारी (ता. २२) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८) आणि स्मित वासुदेव आंबेकर (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेनं फणसवळे कोंड गाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा :Nashik Fire: नाशिकमध्ये अग्नितांडव! घराला आणि गोदामाला भीषण आग; 50 दुचाकी जळून खाक )
8 वर्षाचा तनिष्क हा पहिलीत शिकत होता. तर,7 वर्षांचा स्मित हा अंगणवाडीत शिकत होता. सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास दोघेही आपआपल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले. मात्र, शाळेत न जाता ते दोघेही धरण परिसरातील नदीपात्राच्या दिशेने गेले.
नदीपात्राकडे जात असताना गावातील एक-दोन व्यक्तींनी त्यांना अडवले. परंतु, दोन्ही चिमुकले ग्रामस्थाची नजर चुकवून धरणाच्या दिशेने गेलेच. नदीपात्रातील पाणी पाहून दोन्ही चिमुकल्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात डुबक्या घेत होते. ही सगळी घटना गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी दुरून पाहिली. चिमुकले बुडत असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी चिमुकल्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडाली होती.
लोंढे आणि आंबेकर यांनी चिमुकल्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. दोघांनीही चिमुकल्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर त्यांनी चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं.