धक्कादायक: भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
महिलेने आरोप केला आहे की, मधू चव्हाण यांनी लग्नाचे आमीष दाखवून २००२ ते २०१७ पर्यंत त्यांच्यावर बलात्कार केला.
महाराष्ट्र हाउसिंग अॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका ५७ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारकर्ती महिला चिपळूण येथील शैक्षणिक संस्थेत काम करते. महिलेने आरोप केला आहे की, मधू चव्हाण यांनी लग्नाचे आमीष दाखवून २००२ ते २०१७ पर्यंत त्यांच्यावर बलात्कार केला.
न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा दाखल
प्राप्त माहितीनुसार महिलेने चव्हाण यांच्या विरोधात या आधीही पोलिसांत तक्रार करायचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यानंतर महिलेने चिपळून येथील स्थानिक न्यायालयात दाद मागितली. महिलेच्या याचिकेनंतर चिपळून न्यायालयाने पोलिसांना भाजप नेत्याविरुद्ध महिलेची असलेली तक्रार आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयानेही दिले आदेश
दरम्यान, चिपळूनच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मधू चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हाण दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही चिपळूनच्या स्थानिक न्यायालायलयाचा निर्णय योग्य ठरवला. त्यानंतर चिपळून पोलिसांनी भाजप नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६,३५४,४२०,५०९ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार
दरम्यान, मधू चव्हाण यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. तक्रारदार महिला ही स्वत: महिला असल्याचा फायदा घेत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास केला आहे. माझा न्याय आणि तपास यंत्रणेवर विश्वास आहे. मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.