Ramesh Bais Swearing-in Ceremony: राजभवन येथे 18 फेब्रुवारी रोजी होणार रमेश बैस यांचा शपथविधी; स्वीकारणार महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार
सन 2019 साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक याआधी ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. नवनियुक्त राज्यपाल बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून, त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.
दुसरीकडे, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12.40 वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. बैस यांचे शुक्रवार, दिनांक 17 रोजी सायंकाळी मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.
रमेश बैस यांचा परिचय-
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.
दिनांक 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. सन 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन 1982 ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.
सन 1989 साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. सन 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
सन 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले. सन 2003 साली बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते. (हेही वाचा: मी जे काही बोललो ते 100 टक्के खरे आहे, अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्यावर देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा वक्तव्य)
आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे. सन 2009 ते 2014 या काळात बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.
सन 2019 साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक याआधी ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. नवनियुक्त राज्यपाल बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)