Ram Marathe Music Festival: यंदा 2 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार राम मराठे संगीत महोत्सव; शास्त्रीय गायनासह, कथ्थक नृत्य आणि संगीत नाटकाची मेजवानी

याद्वारे ठाणेकरांना बऱ्याच दिवसांनी संगीत नाटक पाहण्याची संधी मिळणार आहे.

Ram Marathe Music Festival (संग्रहित संपादित प्रतिमा)

ठाणे महानगरपालिका (TMC) यावर्षी 2 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत राम मराठे संगीत महोत्सवाचे (Ram Marathe Music Festival) 27 वे वर्ष आयोजित करणार आहे. महोत्सवादरम्यान संगीत रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य आणि संगीत नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. टीएमसी प्रमुख अभिजित बांगर यांनी याबाबत माहिती दिली. माहितीनुसार, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांना पंडित राम मराठे स्मृती पुरस्काराने, तर गायिका दीपिका भिडे-भागवत यांना राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव होणार असून, तो नागरिकांसाठी विनामूल्य आहे. सायली तळवलकर (गायन), अभिषेक भुरूक (ढोलकी), कल्याण पांडे (तबला), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), संकेत नाशिक (गिटार) महोत्सवात सहभागी होणार आहेत. दिनांक 2, 3 आणि 4 डिसेंबर 2022 रोजी बेगम परवीन सुलताना यांचे सादरीकरण होईल. त्यांच्यासोबत शादाब सुलताना खान असतील आणि दिल्लीतील विधा लाल यांचे कथ्थक नृत्य होईल.

त्यानंतर शोभा चौधरी यांचे ठुमरी/दादरा/भजन आणि अपर्णा केळकर, अविराज तायडे यांची शास्त्रीय संगीत मैफल असेल. प्रख्यात सरोद वादक कोलकाताचे पं. तेजेंद्र मजुमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ठाणेकरांच्या कला साधना कार्यक्रमात निधी प्रभू (कथ्थक नृत्य), कल्याणी साळुंखे (गायन) आणि मुकुंद मराठे (गायन) हे कलाकार सहभागी होणार आहेत. (हेही वाचा: Aapla Dawakhana: मुंबईत 227 ठिकाणी सुरु होणार 'आपला दवाखाना'; सामान्यांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा)

कार्यक्रमात गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटय़ सेवा ट्रस्ट, पुणे प्रस्तुत आणि मराठी रंगभूमी, पुणे निर्मित नाटक संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग होणार आहे. याद्वारे ठाणेकरांना बऱ्याच दिवसांनी संगीत नाटक पाहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी शिवकुमार शर्मा संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे. राम मराठे संगीत महोत्सवात ठाण्यातील उत्साही संगीत, नृत्य आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन टीएमसी प्रमुख अभिजित बांगर यांनी केले आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका शनिवारपासून दुपारी बारा वाजल्यानंतर गडकरी रंगायतन, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपलब्ध होणार आहेत.