मुंबई: पोलिसांना मारहाण केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी राम कदमांचा पोलिसांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल

यावेळी राम कदम आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

BJP Leader Ram Kadam ((Photo Credit: ANI)

काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई पोलिस स्टेशन (Powai Police Station) मधील कॉन्स्टेबलला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांना मारहाण केलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी या आरोपींना सोडा असा विनंती करणारा फोन केला होता. यावेळी राम कदम आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राम कदमांचे हे संभाषण ऐकून सामान्य नागरिक देखील संभ्रमात पडली आहे.

काय होतं नेमकं हे प्रकरण?

भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करताना पोलिसांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी या आरोपींनी गाडीतच नितीन खैरमाडे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.हेदेखील वाचा- Devendra Fadnavis On Security: मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील कधीच सुरक्षा मागितली नव्हती- देवेंद्र फडणवीस

या घटनेनंतर राम कदमांनी पोलिस कर्मचा-याला फोन लावून या कार्यकर्त्यांना सोडण्याची विनंती केली होती. 'तुम्हाला झालेल्या मारहाणीचे मी समर्थन करत नाही. पण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही,' असं म्हणत राम कदमांनी तक्रार मागे घेण्याची मागणी केली आहे. पोलिस कर्मचा-यांशी झालेल्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

'त्या दिपूनं जे केलं ते चूकच आहे. त्याचं समर्थन मी करत नाही. पण आता ज्या पद्धतीने कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा,' अशी विनंती राम कदम यांनी केली आहे. दरम्यान, खैरमाडे यांनी हा महाराष्ट्र पोलिसांच्या आणि माझ्या स्वतःच्या स्वाभिमानाचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, अशी ठाम भूमिका घेत राम कदम यांची विनंती अमान्य केली आहे.