राज्यात वाढत (Coronavirus In Maharashtra) असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. या क्लिपमधील आवाज हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा असल्याचा दावा केला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणात या कथीत क्लिपमधील आवाज माझा नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
राजेश टोपे यांनी काय म्हटले?
'मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही'.
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस संकट आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच हे संकट पुन्हा आव्हान म्हणून उभे राहणार का? असा सवाल उपस्थित होण्यासारखे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पाठीमागील 24 तासात राज्यात तब्बल 4,787 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात 3,853 जणांना कोरोनातून डिस्चार्जही मिळाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 17, 2021
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता ही संख्या 20,76,093 इतकी झाली आहे. यापैकी 19,85,261 जणांवर उपचार केल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 38,013 इतकी आहे. तर 51,631 जणांचा कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 95.62% इतके राहिले आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाटी राज्यात आजवर 15,43,55,268 नमुने तपासण्यात आले. एकूण नमुन्यांपैकी 20,76,093 जणांचे नमुणे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. टक्केवारीत सांगायचे तर हेच प्रमाण 13.43% इतके आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसारर, राज्यात 1,664 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर 1,95,704 जणांना विलगीकरणात कक्षात ठेवण्यात आले आहे.