Rajendra Patil Yadravkar On Rashmi Shukla: काय सांगता? रश्मी शुक्ला यांनी खरोखरच राजेंद्र पाटील यड्रावकर यांना फोन केला होता? जाणून घ्या सत्य

या वेळी यड्रावकर यांनी सांगितले की, 'होय, भाजपमध्ये जाण्यासाठी मला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता.'

Rajendra Patil Yadravkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी अपक्ष आमदार आणि विद्यमान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar ) यांना भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. या फोन टॅपींग प्रकरणामुळे (Phone Tapping Case in Maharashtra) महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. रश्मी शुक्ला यांच्याकडून या आरोपांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे पुढे आली नाही. परंतू, त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना खरोखरच फोन केला होता का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्याुमळे प्रसारमाध्यमांनीच मग यड्रावकर यांना गाठले आणि या प्रकरणाबाबत विचारले.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रसारमाध्यमांनी रश्मी शुक्ला यांच्या कथीत फोनबाबत विचारले. या वेळी यड्रावकर यांनी सांगितले की, 'होय, भाजपमध्ये जाण्यासाठी मला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता.' असे त्यांनी सांगीतले. यड्रावकर यांनी पुढे असेही म्हटले की, त्या वेळी मी त्यांना म्हणालो की, 'मी अपक्ष आमदार आहे. त्यामुळे मला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील जनतेला विचारावे लागेल असे मी त्यांना सांगितले.'

दरम्यान, याबाबतची माहिती मी संबंधीत नेत्यांना दिली होती, असेही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सांगितले. ज्या नेत्यांना आपण ही माहिती दिली ते नेते नेमके कोण होते याबाबत विचारले असता यड्रावकर यांनी मौन बाळगले. तसेच, शुक्ला यांच्याबात झालेल्या संवादाबाबत अधिक माहिती देण्यास तात्पूरता नकार दिला. याबाबत योग्य वेळ आल्यानंतर बोलू असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Jitendra Awhad on Phone Tapping Case in Maharashtra: 'त्या' अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा सल्ला घ्यावा आणि Rashmi Shukla यांच्या विरोधात कोर्टात जावे- जितेंद्र आव्हाड)

राजेंद्र पाटील यड्रावकर हे विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. शिरोळ मतदारसंघातून त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे दावाही केला होता. परंतू, आघाडीच्या जागावाटपात ही जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला गेली. त्यामुळे राजेंद्र पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आणि निवडूणही आले. पुढे युतीचे बिनसले आणि भाजपला अपक्ष आमदारांची सत्तेसाठी नितांत गरज भासू लागली. त्यातून भाजपने अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले. या काळातच रश्मी शुक्ला यांनी यड्रावकर यांना फोन केल्याचे पुढे येत आहे.