MNS Maha Sampark Abhiyan: शिवसेनेतील बंडखोरीचा राज ठाकरे घेणार फायदा; कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी 'महासंपर्क अभियान'ची घोषणा
पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे त्याचे नेतृत्व करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे 5 ते 11 जुलै दरम्यान कोकण दौऱ्यावर येणार आहेत.
MNS Maha Sampark Abhiyan: महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर राज्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी मनसेने 'महा संपर्क अभियान' (Maha Sampark Abhiyan) सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे त्याचे नेतृत्व करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे 5 ते 11 जुलै दरम्यान कोकण दौऱ्यावर येणार आहेत.
शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यानंतर अनेक भागात त्यांची पकड पूर्वीपेक्षा कमकुवत होऊ शकते. त्यामुळे याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे, असे जाणकारांचे मत आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ कोकणातही शिवसेनेचे मजबूत अस्तित्व होते. मात्र, या भागातील प्रमुख पक्षनेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज ठाकरे यांचा पक्ष तेथे स्वत:साठी शक्यता शोधत आहे. (हेही वाचा - Aarey Car Shed Dispute: आरे कारशेड वाद नेमकी काय आहे? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? वाचा सविस्तर)
केडर वाढवण्यासाठी मनसे सक्रिय -
इंडियन एक्स्प्रेसने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, मनसेच्या या महासंपर्क अभियान कार्यक्रमाला शिवसेना कॅम्पमध्ये सुरू असलेल्या गोंधळातून राजकीय फायदा घेण्यासाठी आणि राज्यात कॅडर तयार करण्याची एक चाल म्हणता येईल. मनसेच्या या महासंपर्क अभियानाचे नेतृत्व अमित ठाकरे करणार आहेत. महासंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमित आठवडाभरात कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
अमित ठाकरे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधणार संवाद -
मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, अमित आपल्या दौऱ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी तसेच पक्षात सक्रियपणे काम करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. वृत्तानुसार, शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांनी युवासेना संघटना वाचवण्यासाठी कसरत सुरू केली आहे.
राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद -
नुकतेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावध राहा, विचारपूर्वक पावले उचला, असा सल्ला दिला आहे. देवाने तुम्हाला ही संधी दिली आहे. मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या कामगिरीने ते सिद्ध कराल. महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपात राज ठाकरे यांनी फ्रंटफूटवर येऊन फार काही केले नाही. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मित्र म्हणून अभिनंदन करत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहिले होते.