Raj Thackeray Mumbai Speech: 'एक खून माफ करा', राज ठाकरे यांची मागणी

या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

Raj Thackeray | Twitter/ANI

विधानसभा निवडणूक 2024 केव्हाही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काल विविध पक्ष आणि नेत्यांचा दसरा मेळावा पार पडल्यानंर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा मुंबई येथे पार पडला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांनी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सेल्फी आणि फोटो काढणाऱ्या मंडळींवर तीव्र नाराजी व्यक्ती केली. मी राष्ट्रपतींकडे विनंती करेन. मला एक खून माफ करा. मला ती संधी जर मिळाली.. तर मी ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा उपलब्ध करुन दिला त्याचा खून करेन, अशी मिष्कील टीप्पणी (Raj Thackeray Mumbai Speech) केली.

राज्यात सुरु असलेल्या युत्या आघाड्या आणि पक्ष फोडाफोडी यांवरुनही राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. आज कळतच नाही कोण कोणत्या पक्षात आहे. केव्हाही उठायचे कोणतीही आघाडी स्थापन करायची. लगेच त्यातून बाहेर पडत वेगळेच सरकार स्थापन करायचे, असे उद्योग सुरु आहेत. कालच अनेकांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातील भाषणे पाहिली तर उद्धव ठाकरे हे इतिहासातूनच कधी बाहेरच येत नाहीत. ती वाघनखं, कोतळा, अब्दाली असे काही तरी बोलत असतात. महाराष्ट्रावर कधी बोलणार? असा सवाल उपस्थित करतानाच पुष्पा स्टाईलने हात फिरवत राज यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचीही मिमिक्री केली. (हेही वाचा, Uddhav Thackeray Dasara Melava 2024: "अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान" उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका)

एकदा सत्ता द्या, जगाला हेवा घडवेल असा महाराष्ट्र घडवतो

महाराष्ट्राला कुरतडण्याचे काम सध्या अनेकांकडून सुरु आहे. त्यासाठी देशभरातून प्रयत्न होत आहेत. नुकतेच उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रच काय अवघा देशही हळहळला.. तुम्हाला इतर कोणत्याही क्षेत्रात भ्रष्टाचारी नसलेला व्यक्ती हवा असतो. निकोप व्यक्तीमत्त्व हवे असते तर मग राजकारणात तुमचा तो आग्रह का नसतो? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. याच वेळी त्यांनी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या हातात सत्ता द्या. असा महाराष्ट्र घडवतो, जो कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. इतकेच नव्हे तर दिल्लीत कोणाचेही सराकर येऊदे.. तो कधीही तुटणा-फुटणार नाही, असा महाराष्ट्र उभा करुन दाखवतो, असा विश्वास राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांना आपले भाषण थांबवून स्तब्ध उभे राहून श्रद्धांचली वाहीली. तसेच, आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाशी युती न करता आपण स्वतंत्र निवडणूक लढवू. स्वबळावरच सत्ता आणू, असेही राज ठाकरे यांनी या वेळी म्हटले.