Raj Thackeray Tweet: माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका राज ठाकरेंची ताकीद, उद्धव ठाकरेंवरील हल्ल्यानंतर सोशल मिडीयावर पोस्ट

त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, बांगड्या आणि नारळ फेकत आंदोलन केले.

Photo Credit - Facebook

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, बांगड्या आणि नारळ फेकत आंदोलन केले.  राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यानंतर राज ठाकरेंनी इशारा देत म्हटलं होतं की माझ्या नागी लागू नका नाहीतर माझा मनसैनिक काय करेल हे कळणार पण नाही आणि तेच झालं. त्यानंतर आता राज ठाकरेंनी या प्रकरणावर पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा राज ठाकरेंची पोस्ट -

काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या. बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं. मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.

मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. अशी पोस्ट राज ठाकरेंनी आपल्या एक्स एकाउंटवर केली आहे.