Raj Thackeray On Maratha Aarakshan: 'राज्य सरकार कडून तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार'; राज ठाकरेंकडून मराठा समाजाला जागृत राहण्याचं आवाहन
त्यामुळे पुन्हा 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे.
महाराष्ट्रामध्ये आज विधिमंडळाने विशेष अधिवेशन बोलावत जस्टिस शुक्रे यांचा अहवाल स्वीकारत मराठा समाजाला 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणात देत असल्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया देताना आरक्षण पारित झाल्याचा आनंद पण सरकार कडे आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाने (Maratha Community) जागृत रहावं असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
आज देशात अनेक राज्य आहेत, राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांचेही विषय आहेत. एखाद्या राज्याबाबत, एखाद्या जातीबाबत देशात असं नाही करता येणार नाही, या गोष्टींवर समाजानंही लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.
राज ठाकरे यांच्याप्रमाणेच विरोधकांकडून कॉंग्रेस आमदार आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने मराठा समाजाची फसगत केल्याची भावना बोलून दाखवली आहे. आम्हांला समर्थन द्यावं लागलं कारण अन्यथा आम्ही विरोध करतोय असं बोललं जाईल असे ते म्हणाले आहे. Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत 10% आरक्षण; विधेयक एकमताने मंजूर .
मराठा समाजाला आज स्वतंत्र वर्ग बनवून 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणात देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. सरकारने हे आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. परंतू यापूर्वी दोनदा नाकारलेलं आरक्षण आता कसं टिकणार हे पहावं लागणार आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनीही आरक्षणावर नापसंती दाखवली आहे. आरक्षण प्रश्नी आंदोलन कायम राहणार असून उद्यापासून पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आजपासून राज्य सरकार च्या उपचारांना नाकारले आहे. उद्या आंतरवाली सराटी मध्ये त्यांनी 12 वाजता बैठकीचं आयोजन केले आहे. अधिसूचना काढली मग निर्णय का घेतला जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.