Raj Thackeray On Bharat Ratna Award: "या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता..." भारतरत्न पुरस्कारावर राज ठाकरेंची प्रतिक्रीया

खास करुन रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी काढलेली रथयात्रा देशभर गाजली. ज्याचे पर्यावसन पुढे बाबरी मशीद पाडण्यात झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधानदेखील राहिलीले आहेत.

लालकृष्ण अडवणी (LK Advani) यांना 'भारतरत्न' (Bharat Ratna Award) पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा एक्स हँडलद्वारे केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पुरस्कारावर आपली प्रतिक्रीया दिली असून त्यांनी  'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.  (हेही वाचा - Bharat Ratna Award Announced to LK Advani: लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहले आहे की "भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो."

पाहा पोस्ट -

आपल्या पोस्ट मध्ये पुढे राज ठाकरे यांनी लिहले आहे की "करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन !"