Raj Thackeray On Marathi Boards: दुकानांवर मराठी पाट्या, कोर्टाचा निकाल, अन् राज ठाकरे यांना आनंद; व्यक्त केल्या भावना, वाचा सविस्तर

हा निर्णय महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांच्या बाजूने लागला. हा निकाल लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.

Raj Thackeray On Marathi Boards | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Supreme Court Verdict On Marathi Boards on Shops: दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. हा निर्णय महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांच्या बाजूने लागला. हा निकाल लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील दुकाने, अस्तापनांवर मराठी भाषेत बोर्ड लावण्यात यावे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याविरोधात काही व्यापाऱ्यांनी कोर्टाचे दार ठोठावले होते. हे प्रकरण सुप्रिम कोर्टापर्यंत पोहोचले. ज्याचा आता निकाल आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, दुकानदारांनी पुढच्या दोन महिन्यांमध्ये आपल्या दुकानांवर मराठी भाषेत बोर्ड लावावेत. कोर्टाच्या निकालानंतर राज ठाकरे यांनीही आपल्या खास स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. तसेच, कोर्टाचेही आभार मानले आहेत.

राज ठाकरे यांनी मराठी पाट्या आणि कोर्टाचा निकाल याबाबत 'X' वर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात, ''सस्नेह जय महाराष्ट्र. पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.

असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे.

ट्विट

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका.

'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत.