Raj Thackeray यांचा परप्रांतीयांवर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रातील कोरोना आकडा वाढवण्याचं सांगितलं 'हे' एक कारण!

आज राज्यांत मिनी लॉकडाऊन असल्याने व्यापारांचे प्रश्न, डबघाईला जाणारे उद्योगधंदे आणि यंदा इतक्या तणावाखाली बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थी कसे देणार? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील वाढता कोरोना पुन्हा चिंतेची बाब होऊ लागल्याने आता राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यावर काही सूचना आणि तक्रारींचा पाढा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काल व्हीसी मध्ये मांडला आहे. आज पत्रकार परिषद त्यांनी आज त्या गोष्टी जनतेसमोर देखील ठेवल्या आहेत. दरम्यान यावेळी महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रूग्णांचा होत असलेला कहर पाहता त्याचं एक कारण राज ठाकरे यांनी परप्रांतीय हे देखील म्हटलं आहे. पहिल्या लॉकडाऊन नंतर मजूर आपापल्या राज्यांत गेले. निर्बंध शिथिल झाल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात आले. मात्र तेव्हाच पुन्हा राज्यांत येणार्‍या मजुरांची, परप्रांतीयांची नोंद ठेवा असा इशारा देऊनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता पुन्हा आकडा वाढत असताना कोण-कुठे आहे? कुठून आले आहे? याचा पत्ता नसल्याचं सांगत हे दृष्टचक्र न संपणारं आहे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

परराज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली कोविड 19 ची चाचणी यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत आहेत तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रात कोविड 19 टेस्टिंगचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात. आज यांच्यासोबत 'कोरोना' आहे उद्या दुसरं काहीतरी असेल अशी भीती देखील राज ठाकरेंनी बोलून दाखवली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी शहरात ऑनलाईन डॅश बोर्ड वर बेड रिकामं असल्याचं दाखवलं जातं पण रूग्ण गेल्यास त्याला बेड मिळत नसल्याची तक्रार समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. ही परिस्थिती भयावह असल्याचं सांगताना अमदारांचा, नगरसेवकांचा फोन आल्यावर देण्यासाठी ते बेड रिकामे ठेवले जात असल्याचं सांगितलं जात आहे असेही ग्लोबल हॉस्पिटलमधील प्रकाराचं उदाहरण देत ते म्हणाले आहेत. Raj Thackeray on 100 Crore Extortion: परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटवल्यावरच 100 कोटी रुपयांचा साक्षात्कार का झाला? राज ठाकरे यांचा सवाल.

दरम्यान आज राज्यांत मिनी लॉकडाऊन असल्याने व्यापारांचे प्रश्न, डबघाईला जाणारे उद्योगधंदे आणि यंदा इतक्या तणावाखाली बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थी कसे देणार? हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पेक्षा मानसिक आरोग्य आणि दबावाचा प्रश्न पाहता बोर्डाच्या परीक्षा रद्द करून 10वी. 12वी च्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करावं अशी मागणी देखील राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे.