Mahad MIDC Explosion: महाड एमआयडीसी येथील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत स्फोट; तिघांचा मृत्यू, सात जखमी, 11 बेपत्ता
तर 11 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत, उर्वरीतांचा शोध सुरु आहे
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी (Mahad MIDC) परिसरातील एका औषध निर्माता कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. ब्लू जेट हेल्थकेअर (Blue Jet Healthcare) असे कंपनीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. तर 11 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत, उर्वरीतांचा शोध सुरु आहे, असे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे. स्फोटाचे कारण अद्याप पुढे आले नाही. सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आणन्यावर भर दिला जात आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये ही घटना घडली. जी महाड औद्योगिक वसाहत परिसरात आहेत. मंगळवरी (3 ऑक्टोबर) रात्री 10.30 वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. स्फोट झाल्यानंतर पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग भडकली. कंपनीच्या आवारात असलेल्या रासायनिक बॅरलच्या साठ्यामुळे हा स्फोट आणि आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रथम स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली. ही घटना घडली तेव्हा कामगार कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यापैकी सात जण गंभीररित्या भाजले. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा कंपनीत असलेल्या एकूण कामगारांपैकी 11 जण अद्यापही बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
एक्स पोस्ट
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, कंपनी आवारात असलेल्या रासायनिक पिंपामध्ये पहिल्यांदा मोठा स्फोट झाला. त्यानंतर पुढच्या काहीच क्षणामध्ये हे रसायन आजूबाजूला परसरल्याने आवारात मोठ्या प्रमाणावर आगीने कंपनीला आपल्या कवेत घेतले. परिणामी मदत आणि बचाव कार्याला संधीच मिळाल नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आगीच्या कारणाचा शोध घेत आहेत. यासोबतच राष्ट्रीय अपत्ती निवारण (NDRF) दलाचे जवानही मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये आग आणि स्फोटाच्या घटना अलिकडील काळात वाढल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्यातील सेंच्युरी रेयॉन कारखान्याच्या परिसरात झालेल्या भीषण टँकरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाले होते. 23 सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटाच्या एका दिवसानंतर, अधिकाऱ्यांना जवळच्या इमारत परिसरांमध्ये मृतांच्या "शरीराचे अवयव" सापडले होते. आग आणि स्फोटाच्या घटना टाळण्यासाठी कंपन्यांनी वेळीच उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी पुढे येत आहे.